पाक सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये उद्या ऑपरेशन शील्ड’

नवी दिल्ली, दि. ३० : केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘ऑपरेशन शील्ड’ या व्यापक नागरी संरक्षण सरावाचं औपचारिक अधिसूचनाद्वारे आयोजन जाहीर केलं आहे. उद्या (31 मे) रोजी जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या पाकिस्तान सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये हा सराव पार पडणार आहे. आधी ही ड्रील 29 मे रोजी होणार होती, मात्र प्रशासकीय कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. आता अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की सुधारित तारखेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सीमावर्ती भागांमध्ये दर महिन्याला अशा सरावांचं आयोजन केलं जाईल. या सरावाचा मुख्य हेतू हवाई हल्ल्याच्या चेतावणी यंत्रणा, नियंत्रण कक्ष, तसेच वॉर्डन सेवा, अग्निशमन, बचाव, डेपो व्यवस्थापन आणि स्थलांतरण योजना यांची कार्यक्षमता तपासणं हा आहे.
गुजरातमधील सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये नागरिकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या सरावात हवाई हल्ला झाल्यास नागरिकांचे प्राण वाचवण्याच्या उपायांवर विशेष भर दिला जाणार आहे. ही कारवाई गृह मंत्रालयाने 7 मे रोजी देशभर आयोजित केलेल्या ‘ऑपरेशन अभ्यास’ (Operation Abhyas) नंतर काही आठवड्यांत होत आहे. हे मॉक ड्रिल ‘ऑपरेशन सिंदूर सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पार पडले होते.
हा सराव देशातील नागरी संरक्षण यंत्रणांची तयारी चाचपण्यासाठी घेतला जातो. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरपासून गुजरातपर्यंतच्या पश्चिम सीमावर्ती भागांतील जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले, ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा सामना करण्यासाठी नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. अग्निशमन सेवा आणि होमगार्ड महासंचालनालयाने दिलेल्या पत्रात ‘ऑपरेशन शील्ड’ या सरावाचे आयोजन जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या राज्यांमध्ये होणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.