मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार गुलजार यांना प्रदान
नाशिक, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार उर्दू भाषेतील प्रख्यात कवी तथा हिंदी चित्रपट दिग्दर्शक, गीतकार, लेखक गुलजार यांना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला असून, कुलगुरूंनी या पुरस्काराचे स्वरुप, तसेच या पुरस्कारासाठी जेष्ठ कवी गुलजार यांची कशी निवड करण्यात आली, याबाबत उपस्थितांना माहिती दिली. मानपत्राचे वाचन प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळा गुलजार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी संपन्न झाला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आपले विचार व्यक्त करतांना गुलजार यांनी सांगितले की, कुसुमाग्रजांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतो आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. याप्रसंगी त्यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या. ते जेंव्हा कधी नाशिकमार्गे तसेच पुणेमार्गे जात असत, तेंव्हा कुसुमाग्रज आणि पु. ल. देशपांडे यांना आवर्जुन भेटत असत असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी आपला जीवनप्रवास तथा लहानपणापासून वाचनाची आवड कशी निर्माण झाली, तसेच भारत पाकिस्तान फाळणीच्या काही आठवणी याप्रसंगी सांगितल्या.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून मला हा सन्मान देण्यात आला, याबद्दल मी कायमच विद्यापीठाचा ऋणी राहिल. नाशिक येथे जेव्हा माझा नियोजीत कार्यक्रम असेल, तेव्हा मी आवर्जुन मुक्त विद्यापीठास भेट देण्यासाठी येईल असेही त्यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी गुलजार यांचे पुणे आणि इतर ठिकाणी झालेल्या भाषणाच्या आठवणी उपस्थितांना सांगितल्या. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबाद्दल त्यांनी गुलजार यांचे अभिनंदन केले. अत्यंत अनौपचारीक आणि कौटुंबिक अशा वातावरणात पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
पुरस्कार वितरण प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन आणि कुलसचिव दिलीप भरड, विभागीय संचालक डॉ. वामन नाखले उपस्थित होते. या प्रसंगी लेखक गुलजार यांचे स्नेही अंबरिश मिश्र, अरुण शेवते आणि किशोर मेठे यांची विशेष उपस्थिती होती.
ML/KA/PGB 29 Feb 2024