प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गाभाऱ्यात फक्त या ५ व्यक्ती
अयोध्या, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. अयोध्येत या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी अयोध्या नगरीत सजावट करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून ६ हजारहून अधिक लोकांना आमंत्रण असले तरी मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गाभाऱ्यात उपस्थित राहण्याचा मान फक्त ५ व्यक्तींना मिळणार आहेत.
यज्ञाचे यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर असतील. त्यांच्याशिवाय उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास कार्यक्रमाला उपस्थित असतील.
नव्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येतील. या कार्यक्रमाची रुपरेषा समोर आली आहे. भगवान रामाचं बालरुप असलेल्या प्रभू रामललाच्या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आलेली असेल. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी ही पट्टी हटवण्यात येईल. यावेळी मोदी गाभाऱ्यात हजर असतील.
या कार्यक्रमासाठी आचार्यांची तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. पहिल्या पथकाचं नेतृत्त्व स्वामी गोविंददेव गिरी करतील. तर दुसऱ्या पथकाचं नेतृत्त्व कांची कामकोटी शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती करतील. तर तिसऱ्या पथकात काशीतील २१ विद्वान असतील.
SL/KA/SL
28 Dec. 2023