कांदा व्यापाऱ्यांचा बंद अखेर मागे…
नाशिक, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कांदा निर्यात शुल्क प्रश्नामुळे निर्माण झालेल्या पेचानंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद ठेवल्या होत्या तो बंद आज मागे घेण्याची घोषणा व्यापारी संघटनेने केली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तसेच आमदार राहुल आहेर, नाफेडचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत चर्चा होऊन विविध समस्यांवर विचार विनिमय झाला.
ही चर्चा यशस्वी होऊन बाजार समित्या उद्यापासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांनी जाहीर केला आहे मात्र शक्य असेल तर या बाजार समित्या आज दुपारपासूनच सुरू कराव्यात, शक्य त्या ठिकाणी बाजार समितीचे व्यवहार आज दुपारी सुरू व्हावेत असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यापारी प्रतिनिधींना सांगितले.
नाफेड खरेदी बाबत पारदर्शकता राहावी आणि शेतकऱ्यांना नाफेड ची खरेदी कुठे कुठे सुरू आहे याबाबत विस्तृत माहिती मिळावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी बाजार समिती व्यापार उद्यापासून सुरू करणार असल्याचा निर्णय बैठकीत जाहीर केला.
ML/KA/PGB
23 Aug 2023