उद्यापासून कांदा लिलाव बेमुदत बंद

 उद्यापासून कांदा लिलाव बेमुदत बंद

नाशिक दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या 9 डिसेंबर पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविल्याने त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटू लागले आहेत. शेतकरी आक्रमक झाल्याने लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. तर चांदवड बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे.

चांदवड बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली, या बैठकीत सरकार जोपर्यंत निर्यात बंदी उठवत नाही तोपर्यंत उद्या ९ डिसेंबर पासून जिल्ह्यातील सर्व कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा काढणीस सुरवात झाली आहे. यामुळे सध्या नवीन लाल कांद्याला ३ हजाराच्या दरम्यान भाव मिळत होता. कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णया घेतल्याने त्याचा परिणाम शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना बसणार आहे. तर सद्य परिस्थितीला आवक कमी असल्याने सध्या दरात तेजी असली तरी पुढील काही दिवसात आवक वाढणार असल्याने भाव कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन…

कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान चांदवड बाजार समितीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. तर दुसरीकडे शेतकरी रस्त्यावर उतरत सरकारचा निषेध करत कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी केली आहे. या दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच येवला – नांदगाव रस्त्यावरील बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी रास्ता रोखला.

चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली, यावेळी केंद्र सरकार जोपर्यंत निर्यात बंदी उठवत नाही, तोपर्यंत उद्या ९ डिसेंबर पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या, कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ML/KA/Sl

8 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *