पेट्रोल पंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’ योजना

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल 30 हजारांवर रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहे, अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली.
महसूल मंत्री म्हणाले की, राज्यात मोठया प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. एका अहवालानुसार सुमारे ३० हजारांवर रोजगानिर्मिती होऊ शकेल. त्यामुळे रोजगारवाढीची ही सूचना स्वीकारून निर्णय घेतला. पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण व्हावी यादृष्टीने परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवता येतील का याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी तयार करावी . विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीने सूचना पाठवाव्यात.
“केंद्र सरकारने १६६० पंप मंजूर केले. मात्र काही परवानग्या नसल्याने ते सुरू झाले नाहीत. हे पंप सुरू झाल्यानंतर सुमारे ३० हजारांवर तरुणांना रोजगार मिळेल. राज्यात साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आजच्या स्थितीत रोजगानिर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्याने, एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
SL/ML/SL
28 Feb. 2025