एक दिवसीय पर्यावरण कार्यशाळा
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक वनदिनानिमित्त सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे आणि सामाजिक वनीकरण विभाग, वडगाव मावळ यांच्या वतीने एक दिवसीय पर्यावरण कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरण शिक्षण उपक्रम ईईपी अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध पर्यावरण उपक्रमासाठी शाळेला अनुदान प्राप्त करून देण्यात आले. त्याअंतर्गत शाळेने विद्यार्थ्यांसाठी विविध पर्यावरण उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी सर्पमित्र भास्कर माळी, वृक्षमित्र नीलेश गराडे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे गुरुकुल हायस्कूलचे रंगनाथ वरे यांनी प्लास्टिक पासून विटा कशा तयार करायच्या या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन केले.
फ्रेंड्स ऑफ नेचरचे डॉ. गणेश सोरटे, विश्वास देशपांडे आणि सुधाकर मोरे यांनी विद्यार्थ्यांकडून सीड बॉल तयार करण्याची कार्यशाळा घेतली. शेवटच्या सत्रात अमित पोद्दार यांनी विद्यार्थ्यांना पक्षांविषयी माहिती स्लाइड शोद्वारे सांगितली. डॉ. गणेश सोरटे यांनी पक्षी व प्राणी यांच्यावरील फोटोचे प्रदर्शन भरवले होते. वनपाल बाळासाहेब बरंगुले, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, विश्वास देशपांडे, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, अनुराधा बेळनेकर, सोनाली काशीद उपस्थित होते. कार्यशाळा सफल होण्यासाठी संजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले. One Day Environment Workshop
PGB/ML/PGB
31 March 2024