एक कोटी घरांना मिळणार ३०० युनिट मोफत वीज
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांवर विविध कल्याणकारी योजोनांचा वर्षाव सुरू केला आहे. ‘पीएम सूर्य घर’ योजनेसाठी सरकारने ७५००० कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहेत. तर आरडब्ल्यूए किंवा ग्रुप हाऊसिंग सोसायटीला विद्युत वाहनांसाठी सामान्य प्रकाश किंवा चार्जरसाठी प्लांट उभारण्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे. यासाठी १८००० रूपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जाईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.’पीएम सूर्य घर’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरूवारी (ता.२९) पत्रकार परिषदेत दिल्ली येथे दिली. तसेच मोदी सरकार १७ लाख लोकांना रोजगार देणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर पुढे म्हणाले, “पीएम सूर्य घर’ योजनेद्वारे एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज मिळेल. तर या योजनेमुळे सर्वसामान्यांना १५००० रूपयाचा फायदा होईल. २ किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी सरकार ६० टक्के अनुदान देईल. तर २ किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पात १ किलोवॅट अधिक वाढवायचे असल्यास ४० टक्के अनुदान देखील दिले जाईल. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला सुमारे ७८,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे,: असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले असून रूफटॉप सोलर प्लांट बसवणाऱ्यांना बँकेकडून सुलभ हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाईल असे ठाकूर यांनी म्हटले आहे. या अंतर्गत ग्रामीण भागाला मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित केले जाणार असून उरलेली वीज विकूनही पैसेही कमवू शकतील. रुफटॉप सोलरद्वारे निवासी क्षेत्रात ३० गीगा वॅट सौरऊर्जा क्षमता वाढवली जाईल. ही योजना उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना, O&M आणि इतर सेवांमध्ये १७ लाख लोकांना थेट रोजगार देईल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
SL/KA/SL
29 Feb. 2024