जम्मू काश्मिरमध्ये ६ वर्षांनंतर उठली राष्ट्रपती राजवट, ओमर अब्दुल्ला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने रविवारी अधिसूचना जारी करून हा निर्णय घेतला. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे, त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 19 ऑक्टोबरपर्यंत तीन देशांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अधिसूचनेला मंजुरी दिली. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओबर अब्दुल्ला यांना लवकरच निमंत्रण देण्याची शक्यता आहे.जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती राजवटही संपुष्टात आणल्याने ओमर अब्दुल्ला केव्हाही मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसू शकतील.