विक्रमी मालमत्ता कर संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

 विक्रमी मालमत्ता कर संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

मुंबई दि.9 (एम एमसी न्यूज नेटवर्क): बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६,१९८.०५ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर संकलन केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महापालिका मुख्यालयात आज झालेल्या छोटेखानी समारंभात हे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे उपस्थित होते.

महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी ६,२०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. २६ मे २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत उद्दिष्टाच्या ९९.९७% इतका मालमत्ता कर संकलन करण्यात आला असून, यासोबतच १७८.५ कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात गोळा करण्यात आले आहेत.

प्रशासकीय विभाग पातळीवर उद्दिष्टापेक्षा जास्त कर संकलन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा खास गौरव करण्यात आला. यामध्ये आर मध्य विभागातील विवेक राऊळ (११७%), सी विभागातील श्रीमती अनुप्रिया जाधव (११२.८१%), के पूर्व विभागाचे हृदयनाथ गोसावी (११२.८१%), एफ उत्तरचे राजू काठे (११२%) आदी अधिकारी आघाडीवर होते. याशिवाय इतर ९ अधिकाऱ्यांनाही प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी बोलताना आयुक्त श्री. गगराणी म्हणाले, “महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेला मालमत्ता कर संकलन, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने शक्य झाले आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना त्रास न होता, कर संकलन अधिक प्रभावी पद्धतीने व्हावे, याकडे लक्ष द्यावे.”

अतिरिक्त आयुक्त डॉ. जोशी यांनीही सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करत, “संरक्षणात्मक दृष्टिकोन न ठेवता, संपूर्ण विभागाने प्रभावीपणे कार्य केले. निर्धारित उद्दिष्ट गाठण्यात यश मिळवले, ही अभिमानास्पद बाब आहे,” असे सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *