सावित्रीबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, वेबसाईटवर कारवाईचे निर्देश
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी केली होती, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, नेते छगन भुजबळ आदी यात सहभागी होते.
ML/KA/SL
31 May 2023