मराठा आरक्षणाच्या निर्णया विरोधात ओबीसी समाजाकडून महामोर्चाची घोषणा
नागपूर, दि. ६ : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. आज नागपूरात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महामोर्चाची माहिती देताना म्हटले की, ‘राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो. हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. याविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपूरात ओबीसींचा महामोर्चा काढणार आहोत.
नागपुरात झालेल्या आजच्या बैठकीला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील ओबीसी नेते उपस्थित होते. यात आमदार अभिजित वंजारी, माजी खासदार खुशाल बोपचे, ओबीसी नेते शेखर सावरबांधे, ओबीसी अभ्यासक नागेश चौधरी, ओबीसी नेते ईश्वर बाळबुधे, ओबीसी नेते ज्ञानेश वाकुडकर यांच्यासह इतरही नेते हजर होते.