जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा खऱ्या ओबीसींनाच मिळाव्यात
पुणे, दि, १३:
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागांवर खऱ्या ओबीसींना उमेदवारी मिळावी. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिली गेल्यास ओबीसी बहुजन महासंघ सर्वच जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा इशारा ओबीसी बहुजन महासंघाचे बाळासाहेब झोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी बहुजन महसंघाचे भानुदास पानसरे, किसन नांगरे, चंदाताई केदारी, आनंद रोकडे, राजेंद्रभाऊ नांगरे, विशाल शेळके, महादेव मरगळे, भाऊसाहेब मरगळे, अशोक कांबळे, भाऊसाहेब आखाडे, कृष्णा पानसरे आदी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या नऊ जागांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी ३ तर अनुसूचित जातीसाठी १ जागेवर आरक्षण मिळाले आहे. या जागांवर केवळ खऱ्या ओबीसींचाच हक्क आहे. त्यामुळे या जागांवर खऱ्या ओबीसी उमेदवारांनाच संधी मिळावी, अशी आग्रही मागणी ओबीसी बहुजन महासंघाने सर्वच राजकीय पक्षांना केली आहे.
ओबीसींच्या हक्काच्या जागांवर कुणबी प्रमाणपत्र मिळविल्या उमेदवारांना उभे केल्यास ओबीसी बहुजन महासंघ आरक्षित जागाच नव्हे तर सर्वच ९ जागांवर निवडणूक लढविण्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. केवळ निवडणूक जिंकणे, हरणे एवढ्यापुरता हा प्रश्न नाही तर ओबीसी, बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. उद्या आमचे ग्रामपंचायत सदस्य पदावरही ओबीसी बहुजन दिसणार नाही. गावगाड्यातून आम्हाला नाहीसे करण्याचा हा प्रयत्न आहे, अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
गुरुवारी ओबीसी महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन
आपल्या भावना सर्वच राजकीय पक्षांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि ओबीसी बहुजन आणि रिपब्लिकन समाजाची एकजूट दाखविण्यासाठी गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी मुळशी तालुका ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.KK/ML/MS