पुण्यात झिका विषाणूबाधितांची संख्या ४५ वर, दोघांचा मृत्यू
पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड पाऊस आणि पूरामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता झिका विषाणूचा मोठा धोका उत्पन्न झाला आहे. पुण्यात झिका विषाणूची लागण झालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. काल पुण्यात झिकाचे आठ रुग्ण (Pune zika death) आढळून आले आहेत. त्यामुळे आता शहरातील एकूण रूग्णसंख्या 45 वर पोहोचली आहे.
झिका विषाणूची लागण झालेल्या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना हृदय आणि यकृताचा आजार होता. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झिकामुळे झाला किंवा इतर गुंतागुंत कारणीभूत असल्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढील विश्लेषणासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला पत्र लिहिलं आहे.
मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचं वय 71 पेक्षा जास्त आहे. यापैकी एका रुग्णाला सह्याद्री रुग्णालयात तर दुसऱ्या रुग्णाला वारजे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जोशी रुग्णालयात 14 जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्यविषयक समस्यांमुळे मृ्त्यू झाला. 19 जुलै रोजी त्यांना झिका विषाणूचं निदान झालं होतं. खराडी येथील रूग्णाचे अनेक अवयव निकामी झाल्याने सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 21 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 23 जुलै रोजी झिका झाल्याचे निदान झाले. रविवारी शहरात नोंद झालेल्या आठ नवीन रुग्णांमध्ये दहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
SL/ML/SL
29 July 2024