धाराशिवमध्ये अणुऊर्जा आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्प

 धाराशिवमध्ये अणुऊर्जा आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्प

धाराशिव, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारच्या मित्र या संस्थेच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे, राज्यात या माध्यमातून पाच मोठे प्रकल्प सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस असून या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. कांद्याच्या दरात स्थिरता राहुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा निर्यातक्षम व्हावा म्हणून कांद्यावर प्रक्रिया आणि साठवणूक यासाठीचा हा मोठा प्रकल्प धाराशिव जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अडीचशे एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.अणुऊर्जा प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी परदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून निर्यातक्षम शेतमाल निर्मिती असे या प्रकल्पाचे ब्रीदवाक्य राहणार आहे असे प्रतिपादन मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज धाराशिव येथे पत्रकार परिषदेत केले.

राज्यात दहा लाख मेट्रीक टन कांद्याचे साठवणूक आणि निर्यातक्षम कांदा तयार करण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन क्षमतेचे पाच प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातील पहिला प्रकल्प धाराशिव जिल्ह्यात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प एकूण 800 कोटी पर्यंतचा असणार आहे.याचा पहिला टप्पा 100 कोटींचा असून तीन महिन्यात त्याचा प्रकल्प अहवाल तयार करून प्रकल्प कार्यान्वित करण्याचे प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यावेळी म्हणाले.पहिल्या टप्प्यात कांदा या पिकाची महा बँक आणि कांद्याची साठवणूक या प्रकल्पाच्या माध्यमातून वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.कांद्याच्या किमतीमध्ये स्थैर्य रहावे यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहे.

कांदा साठवणूक आणि निर्यात यासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने गेमचेंजर ठरणार असून राज्यातला दहा लाख टन कांदा निर्यात क्षम व्हावा यासाठी या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यावेळी म्हणाले. अणू किरणांच्या माध्यमातून प्रक्रिया करून कांद्यासोबतच फुले, भाजीपाला तसेच द्राक्षापासून बेदाणे, मटण यासारख्या निर्यातक्षम उत्पादनावर या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांची साठवणूक क्षमता वाढवून निर्यातक्षम बनवले जाणार आहे,धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

धाराशिव सोबतच सोलापूर आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनीही या प्रकल्पाच्या अनुषंगाने तयार करण्यात येणाऱ्या प्रकल्प अहवालात आपल्या सूचना देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले.

ML/ML/SL13 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *