आता वंदे भारत ईशान्य भारतातही
नवी दिल्ली, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रेल्वेच्या इतिहासात अद्ययावत तंत्रज्ञान आणि तत्परसेवा यांसाठी अल्पावधितच प्रवाशांच्या मनात स्थान मिळवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्येकडील पहिल्या आणि देशातील 19व्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. ही ट्रेन आसाममधील गुवाहाटी ते पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीपर्यंत धावणार असून 5.5 तासांत 411 किलोमीटरचे अंतर पार करेल.
या कार्यक्रम प्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आज ईशान्येकडील कनेक्टिव्हिटीशी संबंधित तीन कामे केली जात आहेत. ईशान्येला पहिला मेड इन इंडिया वंदे भारत मिळत आहे. दुसरे- पश्चिम बंगालला जोडणारी हा तिसरा वंदे भारत आहे. तिसरे- मेघालयातील सुमारे 425 किमी ट्रॅकवर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
गुवाहाटी-न्यू जलपाईगुडी वंदे भारत ट्रेन न्यू अलीपुरद्वार, कोक्राझार, न्यू बोंगाईगाव आणि कामाख्या स्थानकावर थांबेल. 8 डब्यांची ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ट्रेन न्यू-जलपाईगुडी जंक्शन सकाळी 6:10 वाजता सुटेल आणि दुपारी गुवाहाटीला पोहोचेल. त्या बदल्यात ट्रेन गुवाहाटी येथून 4:30 वाजता सुटेल आणि सुमारे 10:20 वाजता न्यू जलपाईगुडीला पोहोचेल.
SL/KA/SL
29 May 2023