आता विद्यापीठे घेणार पर्यटनस्थळे दत्तक
नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील वैविध्यपूर्ण पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटन मंत्रालय सातत्याने कार्यरत आहे. आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील विद्यार्थ्यांना देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती, वास्तू, वन्यजीवन माहिती होण्यासाठी योजना तयार केली आहे. त्यानुसार विद्यापीठे-उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटन स्थळ दत्तक घ्यावे लागणार असून, विद्यार्थ्यांनी संबंधित पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, सहली आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.
शहर, गाव, अभयारण्य किंवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण विद्यापीठाने निश्चित करून दत्तक घ्यायचे आहे. पर्यटन स्थळांची यादी http://www.incredibelindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणाच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदी उपक्रम वर्षभर आयोजित करावे लागतील. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ, संग्रहालय, अभयारण्य, हस्तकला केंद्र अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची दोन ते तीन दिवसांसाठी अभ्यास सहल आयोजित करावी लागेल. त्यासाठी विद्यापीठांनी राज्यातील पर्यटन अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी लागेल. जेणेकरून संग्रहालयासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ केले जाईल. भेटीनंतरचा अहवाल विद्यापीठाने सादर करायचा आहे.