आता धाराशिवमध्ये सरपंचाला जाळून मारण्याचा प्रयत्न

 आता धाराशिवमध्ये सरपंचाला जाळून मारण्याचा प्रयत्न

धाराशिव, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर हल्ला करत पेट्रोलचे फुगे टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंचांबरोबर असलेली एक व्यक्ती जखमी झाली असून प्रसंगावधान साधून सरपंचानी आपला बचाव केला. ही घटना कळताच पोलिसांनी घटना स्थळाला भेट देऊन वेगाने तपास सुरू केला आहे. या घटने मागे कोण आहे याचा तपासही सुरू झाला आहे.

हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची चर्चा आहे तर निकम यांनी या हल्ल्यामागे पवनचक्कीचा वाद असल्याचा आरोप केलाय. यावेळी निकम यांनी रात्री गावाकडे जात असताना दोन मोटार सायकलधारक हे हॉर्न वाजवत होते त्यांना पुढे जायचे आहे असे वाटल्याने आम्ही गाडीचा वेग कमी केला तर एका बाजूने दगड मारून गाडीची काच फोडण्यात आली आणि गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले. त्यामुळे आम्ही गाडीचा वेग वाढवला तर आमच्या गाडीवर अंडी फोडण्यात आली. याने पुढचे काहीच दिसेना म्हणून पुन्हा वेग कमी करावा लागला. त्यानंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला असल्याची आपबीती सरपंच नामदेव निकम यांनी सांगितली.

गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पवनचक्क्यावरून वातावरण तापले आहे. पवनचक्की मालकांनी गुंडाकरवी दहशत पसरवण्याचे काम सुरू केलं आहे , मारहाण, जीवघेणे हल्ले करण्यात येत आहेत, त्यामुळे जिल्ह्यात पवनचक्क्याच्या नावाने मालकाकडून होणारी ही दहशत पोलीस कशी मोडून काढणार याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या घटनेचा सर्वांगाने तपास करण्यात येईल असे सांगितले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *