आता आनंदी क्षणांत सहभागी होण्यासाठीही कैद्यांना मिळू शकतो पॅरोल
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने आज पुढील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या मुलाची पाठवणी करण्याकरीता खुनाच्या आरोपांतील दोषसिद्ध आरोपीला १० दिवसांचा पॅरोल मंजूर केला.दोषसिद्ध आरोपीला वैद्यकीय कारणास्तव किंवा आकस्मिक परिस्थितीत कुटुबीयांच्या दुःखात सहभागी होता यावे यासाठी पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. तर आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी पॅरोल का मंजूर केला जाऊ नाही ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. हा सवाल करत कैद्यांना पॅरोलवर सोडण्याबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
मुलाला ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. त्याच्या शिक्षणाचे शुल्क आणि इतर खर्चाची व्यवस्था करण्यासाठी तसेच त्याला निरोप देण्यासाठी विवेक श्रीवास्तव दोषसिद्ध आरोपीने पॅरोल देण्याच्या मागणीसाठी याचिका केली होती. परंतु, सर्वसाधारणपणे आपत्कालीन अथवा वैद्यकीय परिस्थितीत आरोपीला पॅरोल मंजूर केला जातो. मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था करण्याच्या आणि मुलाला परदेशी जाताना निरोप देण्याच्या कारणासाठी पॅरोल मंजूर केला जात नाही, असा दावा करून सरकारने श्रीवास्तव याच्या याचिकेला विरोध केला.
तथापि, दु:खाप्रमाणेच आनंद हीदेखील एक भावना आहे. कुटुंबीय दुःखात असेल, तर त्यात सहभागी होण्यासाठी आरोपीला पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पॅरोल मंजूर करायला हवा, असे न्यायालयाने पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे.
कारागृहातील दोषींना बाहेरील जगाशी संपर्क साधता यावा आणि कौटुंबिक सुख – दुःखात सहभागी होता यावे यासाठी पॅरोलवर काही काळाकरिता सशर्त सुटका करण्यात येते. शिक्षा भोगणारी किंवा तुरुंगात बंदिस्त असलेली व्यक्ती आरोपी असली तरी ती कोणाचा मुलगा, पती, वडील, भाऊ असते. त्यामुळे, न्यायालय दोषसिद्ध अथवा आरोपींच्या पॅरोल आणि फर्लोच्या अर्जांचा मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करते, असे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश देताना स्पष्ट केले आहे.
SL/ML/SL
13 July 2024