आता रक्त मिळणार विनामूल्य, द्यावे लागेल केवळ प्रक्रिया शुल्क
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या काळात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.शहरात, गावात विविध ठिकाणी नेत्यांचे वाढदिवस आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन आवर्जून केले जाते. हे रक्तदान मोफत केले जात असले तरी हॉस्पिटलमध्ये गरज पडते तेव्हा रुग्णाला रक्त विकत घ्यावे लागते. आपत्कालिन स्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांकडून रक्त पिशवीसाठी मोठी रक्कम वसुल केली जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी DCGI परिपत्रक जारी करून यापुढे रक्त पिशवीची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. यापुढे रक्तपेढ्यांना रक्ताच्या पिशवीवर फक्त प्रक्रिया शुल्क आकारता येणार आहे.
रक्ताच्या प्रक्रिया खर्च किती असावा याबाबत केंद्र सरकारने २०२२ मध्ये नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार रक्तदात्या कडून घेण्यात आलेल्या रक्ताच्या प्रक्रियेवरी खर्च १, ५५० रु पेक्षा अधिक असू नये असे स्पष्ट केले आहे. तर लाल रक्तपेशी , प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स यांवर अनुक्रमे १५५०, ४०० आणि ४०० अशी प्रकिया खर्चाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सरकारी रक्तपेढ्यासाठी मात्र हा खर्च ११०० रु एवढा निश्चित करण्यात आला आहे.
प्रक्रिया शुल्क आकारण्याचे कारण
रक्तदान शिबिरांतून संकलित करण्यात आलेले रक्त रुग्णाला थेट चढवता येत नाही. या रक्तावर प्रक्रिया करावी लागते. रक्तातील घटक विलग करून लाल रक्तपेशी,पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट्स, प्लाझमा अशा स्वरुपात या संकलित रक्ताचे पृथक्करण करावे लागते. तसेच एका विशिष्ट तापमानाला त्याची साठवण करावी लागते. या सर्व प्रकियेचा प्रक्रिया खर्चात समावेश होतो. आता या प्रक्रिया शुल्काच्या व्यतिरिक्त रक्ताच्या पिशवीवर कोणतेही विक्रीमूल्य आकारता येणार नसल्याचे DCGI ने स्पष्ट केले आहे.
SL/KA/SL
5 Jan. 2024