आता वर्षातून दोन वेळा होणार १० वी, १२ वी च्या परीक्षा
वर्षानुवर्ष चाकोरीबद्ध राहीलेल्या परीक्षा पद्धती आणि शिक्षणक्रमामध्ये नव्या शैक्षणिक धोरणामुळे आमुलाग्र बदल होऊ घातले आहेत.याआधी दहावी आणि बारावी या बोर्डांची परीक्षा वर्षांतून एकदाच होत असे त्यामुळे अपयश आल्यास पूर्ण वर्ष वाया जात असे. आता या बोर्ड परीक्षांच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल होणार आहे. नव्या राष्ट्रीय धोरणाबाबत नुकत्याच झालेल्या एका बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, पुढील वर्षीपासून संपूर्ण देशात बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होतील. या निर्णयामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना चांगले गुण मिळवण्याची संधी मिळेल.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मते, नव्या शैक्षणिक धोरणात बोर्ड परीक्षांची नवी संरचना तयार झाली आहे. २०२४ च्या शैक्षणिक सत्रात पुस्तकेही त्यानुसारच तयार केली जातील. दोन वेळा बोर्ड परीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश मुलांचे विषयांवर लक्ष केंद्रित करणे आहे. याबाबतची शिफारस केंद्राला पाठवली आहे. ते राज्यातील बोर्डांना याबाबत निर्देश देऊ शकतात.नव्या अभ्यासक्रमामध्ये अकरावी आणि बारावीच्या मुलांना दोन भाषांमध्ये शिक्षण घ्यावे लागेल. त्यापैकी एक भाषा भारतीय असेल. हा दृष्टिकोन भाषिक वैविध्यावर जोपासण्यास मदत होईल.
नव्या पॅटर्नमुळे विद्यार्थी कमकुवत विषयाची चांगली तयारी करू शकतील. अभ्यासाच्या तयारीचे स्वत: मूल्यांकन करू शकतील.एकच विषय किंवा त्याच्याशी संबंधित तथ्ये विद्यार्थ्यांना वर्षभर लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. अभ्यासाची पुस्तकेही तशीच तयार करण्यात येतील.अनेक महिने कोचिंगची गरज भासणार नाही. अभ्यास लक्षात ठेवण्याऐवजी समज आणि पात्रतेचे मूल्यांकन करण्याची क्षमता वाढेल. विषयांचे सखोल ज्ञान आणि त्याचे व्यावहारिक कौशल्य सक्षम होईल.
या राज्यांचा विरोध
तामिळनाडू, केरळ सरकारने यापूर्वीच नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यास नकार दिला आहे. कर्नाटकही याच दिशेने वाटचाल करत आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, कर्नाटक राज्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार केले जाईल. त्यावर काम करण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे.
नवे धोरण लागू झाल्यानंतर मुलांना कला, विज्ञान किंवा वाणिज्याशिवायही नवे विषय निवडण्याची संधी मिळेल. नवे विषय भविष्यातील गरजांनुसार असतील. शिक्षण महामंडळांना मागणीआधारित परीक्षा घेण्याची क्षमता विकसित करावी लागेल.नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार केला आहे. केंद्राने तो एनसीईआरटीला दिलाय. सध्या राष्ट्रीय निरीक्षण समिती आणि अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक समिती याचा अभ्यास करत आहे. त्या ३ ते १२ वीच्या अभ्यासक्रमाला अंतिम रूप देतील, असे प्रधान म्हणाले.
SL/KA/SL
24 Aug 2023