नोव्हाक जोकोविच चौथ्यांदा ठरला अमेरिकन ओपनचा विजेता

 नोव्हाक जोकोविच चौथ्यांदा ठरला अमेरिकन ओपनचा विजेता

न्यूयॉर्क, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्र्वविख्यात सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचनं चौथ्यांदा अमेरिक ओपन स्पर्धा जिंकली असून त्याचं हे कारकिर्दीतलं तब्बल २४वं ग्रँड स्लॅम ठरलं आहे.अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा तीन सेटमध्ये पराभव केला. विजयानंतर ३६ वर्षीय जोकोविचनं भावनिक प्रतिक्रिया दिली तो म्हणाला “मी कधीच कल्पना केली नव्हती की कधीतरी मी अशा प्रकारे तुमच्यासमोर उभा राहून माझ्या २४व्या ग्रँडस्लॅमविषयी बोलेन. हे कधी प्रत्यक्षात उतरेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. पण गेल्या दोन वर्षांत मला असं वाटू लागलं होतं की मी हे करू शकतो. मला संधी आहे. मला इतिहास घडवण्याची संधी असेल तर मी ती का घेऊ नये?”

तीन सेटमध्ये नोव्हाक जोकोविचनं डॅनिल मेदवेदेव याचा पराभव केला.या दोघांमध्ये झालेले तिन्ही सेट टेनिस प्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले. नोव्हाकनं त्याच्या चाहत्यांना अजिबात निराश न करता आपण जगज्जेतेपदासाठी का दावेदार आहोत? याचा नमुनाच अवघ्या जगासमोर सादर केला. पहिल्या सेटमध्ये नोव्हाकनं ६-३ असा सहज विजय मिळवत आपला क्लास दाखवून दिला. पण मेदवेदेवसाठी खरी परीक्षा दुसरा सेट ठरली!

दुसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवनं कडवी झुंज देत आपणही यूएस ओपनच्या अंतिम फेरीला साजेसा खेळ केला. पण नोव्हाकच्या अव्वल दर्जाच्या फटक्यांसमोर मेदवेदेवला अखेर शरणागती पत्करावी लागली. हा सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर नोव्हाकनं आपला खेळ अजून उंचावत सेट खिशात घातला. ७-६(५) असा हा सेट जिंकून जोकोविचनं आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दमछाक झालेल्या मेदवेदेवला तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकनं ६-३ असं सहज हरवत चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं!

या विजयाबरोबरच आपल्या कारकिर्दीतलं २४वं ग्रँडस्लॅम पटकावताना नोव्हाक जोकोविचनं मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आत्तापर्यंत जोकोविच व सेरेना विल्यम्स हे २३ ग्रँडस्लॅमसह बरोबरीत होते. मात्र, रविवारच्या विजयानंतर आता तब्बल २४ ग्रँडस्लॅम नावावर असणारा नोव्हाक जोकोविच हा जगातला एकमेव टेनिसपटू ठरला आहे. याआधी मार्गारेट कोर्ट यांनीह २४ पदकं पटकावली होती. पण त्यातली १३ पदकं ही त्यांना ‘ग्रँडस्लॅम’ म्हणून मान्यता मिळण्याआधी जिंकली होती.

SL/KA/SL

11 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *