फोटोसाठी अध्यक्ष आणि मुख्यमंत्रीच नाहीत, पुन्हा झाला कार्यक्रम

नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेच्या नागपूरच्या शेवटच्या सत्रासाठी आलेल्या विद्यमान सदस्यांच्या एकत्रित फोटोसाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्रीच उपस्थित न राहिल्याने फोटो पुन्हा काढायची वेळ आल्याची नामुष्की आज ओढवली.
सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ जेमतेम दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला असेल तेव्हा नवीन विधानसभा अस्तित्वात येईल , म्हणून आज सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सभागृहाच्या पायऱ्यांवर सदस्य जमलेही मात्र खुद्द अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार गायबच होते. अखेर फोटो न काढताच सभागृह भरले.
कामकाज सुरू होताच विरोधी सदस्य आक्रमक झाले, त्यांनी हा सर्व प्रकार कथन करीत हा अवमान असल्याचे अध्यक्षांना सांगितले , ज्येष्ठ सदस्यांना योग्य मान मिळाला नाही अशी त्यांची तक्रार होती. अखेर अध्यक्ष नार्वेकर यांनी प्रश्नोत्तरे संपताच कामकाज थांबवून फोटो काढण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल असे सांगितले आणि त्यानुसार पुन्हा फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला.
SL/KA/SL
14 Dec. 2023