रायगडमधील कर्करोग रुग्णालयाला मुद्रांक शुल्क माफ

 रायगडमधील कर्करोग रुग्णालयाला मुद्रांक शुल्क माफ

मुंबई दि. १९: — महाराष्ट्रात आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य सरकारच्या महसूल विभागाने टाटा मेमोरिअल सेंटरच्या प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.

या प्रकल्पासाठी १० हेक्टर (४० एकर) शासकीय जमीन ३० वर्षांसाठी नाममात्र रुपये १/- प्रतिवर्ष भाडेतत्त्वावर देण्यात आली असून, या जमिनीच्या भाडेपट्टा करारनाम्यावरील रु. ३८.९९ लाखांचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

टाटा मेमोरिअल सेंटर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील तांबटी येथे एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राची स्थापना करत आहे. या केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार असून, शासनाने ही जमीन संस्थेला नाममात्र भाडेपट्ट्याने दिली आहे. या जागेच्या भाडेपट्टा करारावर देय असलेले ३८.९९ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची विनंती संस्थेने केली होती.

या रुग्णालयातील यापैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, सर्वसाधारण जनता आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांच्या सवलतीच्या दरात राखीव ठेवण्यात येतील. तसेच, रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरात निवास सुविधा उपलब्ध करून देण्याची अटही घालण्यात आली आहे. वाढत्या कर्करोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प लोकहितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, अंतर्गत शासनाने हा शुल्कमाफीचा निर्णय घेतला असून, याबाबतचे आदेश विधि व न्याय विभागाशी विचारविनिमय करून राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहेत.

या निर्णयामुळे टाटा मेमोरियल सेंटरला कर्करोग संशोधन आणि उपचार सुविधा विस्तारण्यास प्रोत्साहन मिळेल, तसेच सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *