iPhone निर्मिती कंपनीत नोकरीसाठी लग्न झालेल्या महिलांना No Entry! राज्य सरकारने अहवाल मागितला
भारतात ॲपलचा आयफोन असेंब्ली प्लांट चालवणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीला कारखान्यात विवाहित महिलांना नोकरी देत नसल्याचे समोर आले आहे. Apple Inc.,ने भारतात आयफोनचे उत्पादन वाढवले आहे. भारतात, हे काम त्याचे मुख्य पुरवठादार फॉक्सकॉन करते. तामिळनाडू येथील प्लांटमध्ये विवाहित महिलांचे नोकरीचे अर्ज नाकारले जात असल्याचे रॉयटर्सच्या एका तपास अहवालात आढळले. रॉयटर्सने ही माहिती दिली होती. अविवाहित महिलांपेक्षा विवाहित महिलांवर अधिक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे कंपनी त्यांना कामावर ठेवू इच्छित नाही, असे कंपनीचे मत आहे.
रॉयटर्सच्या या अहवालात पार्वती आणि जानकी या 20 वर्षांच्या दोन बहिणींचा उल्लेख करण्यात आला आहे. चेन्नईतील फॉक्सकॉनच्या आयफोन कारखान्यात त्यांना या भेदभावाला सामोरे जावे लागले. यासंदर्भातील अहवालाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. याप्रकरणी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने तामिळनाडू कामगार विभागाकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे. समान मोबदला कायद्याचा हवाला देत कामगार मंत्रालयाने हा अहवाल मागवला आहे.