नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास लंडन कोर्टाची मान्यता
मुंबई, दि.९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फरार भारतीय हिरे व्यापारी नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास आज लंडन उच्च न्यायालयाने मंजुरी दिली. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी भारतातून फरार झाला होता. त्याने तब्बल १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्याचा तपास होणार आहे.
नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात यावं, यासाठी लंडन कोर्टात भारताकडून सातत्याने बाजू मांडली जात होती. याविरोधात नीरव मोदीनं लंडन उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, आज या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बँकेकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांचा नीरव मोदीच्या ताब्यातील कंपन्यांना फायदा झाल्याचा आरोप या घोटाळ्यात करण्यात आला होता. यासोबतच, पुरावे गायब करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकणे, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणे असे गुन्हेदेखील सीबीआयनं नीरव मोदीवर दाखल केले आहेत. नीरव मोदी 2018 पासून भारतामधून फरार झाला आहे.
9 Nov. 2022