बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसणाऱ्या ९० हजार भारतीयांना अटक
न्यूयॉर्क, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेला तापसी पन्नू आणि शाहरुख खान या जोडीचा ‘डंकी’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. परदेशात बेकायदा प्रवेश करणाऱ्या भारतीयांवर तो आधारीत आहे. या घटना केवळ काल्पनिक नाहीत तर दरवर्षी हजारो भारतीय नोकरी आणि शिक्षणानिमित्त बेकायदा अमेरिकेत प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात अशा तब्बल ९० हजार भारतीयांना अमेरिका अटक झाली आहे.
जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली असल्याचे अमेरिकेच्या कस्टम विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या विभागाने नुकतीच आकडेवारी जारी केली असून १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेच्या सीमेच्या आत बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल ९०,४१५ भारतीयांना अटक करण्यात आलेली आहे. यातील ५० टक्के भारतीय हे गुजरात राज्याचे निवासी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. या कालावधीदरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करताना दर तासाला १० भारतीयांना अटक करण्यात आली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यापैकी ४३,७६४ भारतीयांना अमेरिका-कॅनडा सीमेवर अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश घडवून आणण्यासाठी गुजरातमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला असल्याचे गुजरातच्या सीआयडीच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. हे एजंट विविध गैरमार्गाने तरुणांना अमेरिकेत प्रवेश घडवून आणण्याचे आश्वासन देतात. यासाठी प्रवास खर्च, प्रवासासाठीचा व्हिसा आणि दुबई, मेक्सिकोतील मुक्कामासाठी ६० ते ७० लाख रुपये फी आकारत असल्याची माहिती पुढे आली होती.
SL/ ML/ SL
25 Oct 2024