शेतशिवारात नीलगायींचा हरभरा पिकात हैदोस…
वाशिम, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील गणेशपूर शेत शिवारात नीलगायींच्या कळपाने धुडगूस घालून चार एकर हरभऱ्याचे पीक फस्त केले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकऱ्यांनी वारंवार वनविभागाकडे नीलगायींसह अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
आमच्या पिकांचे नुकसान झाल्यावर आम्हाला कोण भरपाई देणार? शेती करताना आमच्या पाठीशी कोणी उभं राहणार नसेल तर आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नीलगायींच्या हल्ल्यामुळे या परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. वनविभागाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
ML/ML/SL
11 Jan. 2025