निलेश साबळेंचे झी-मराठी मंचावर पुनरागमन
मुंबई, दि. १६ : चला हवा येऊ द्या,या कॉमेडी शोच्या माध्यमातून दशकभराहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवणारे सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी काही काळ ब्रेक घेतला होता. आता ते त्यांच्या हक्काच्या झी मराठी प्लॅटफॉर्मवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेता भाऊ कदमही निलेश सोबत या नवीन कार्यक्रमात दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आता कमबॅक होणार’ असं म्हणत दोन कलाकारांच्या पुनरागमनाचा व्हिडिओ झी मराठी वाहिनीच्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली. पाठमोरे उभं राहून हे दोन कलाकार स्वतःच्या कमबॅकविषयीचे संवाद म्हणातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम हे दोन विनोदवीर पुन्हा एकदा एकत्र एका कार्यक्रमात दिसणार आहेत. या दोघांचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. प्रेक्षक पण करत आहेत wait..कधी होणार या दोघांची भेट? असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
प्रोमोत निलेश साबळेच्या हातात आरतीचं ताट आहे, तो देव-देवतांच्या मूर्तीसमोर पूजा करताना दिसतोय. तर दुसरीकडे भाऊ कदम निलेशच्या घराकडे येण्यासाठी आतुर झालेला दिसतोय. या व्हिडिओच्या बॅकराऊंडला कभी खुशी कभी गममधील संगीत वाजताना दिसतंय. मजेशीर अशा या प्रोमोनं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
दरम्यान, ‘ उगाच अॅवॉर्ड्स’ या झी मराठीवर होणाऱ्या सोहळ्याचं ते सूत्रसंचालन करणार असल्याचं कळतं. सर्वोत्कृष्ट रडूबाई, सर्वोत्कृष्ट लोटपोट सीन, सर्वोत्कृष्ट कानाखाली जाळ, सर्वोत्कृष्ट चाबूक डायलॉग, सर्वोत्कृष्ट ढिशूमढिशूम, सर्वोत्कृष्ट इलुइलू असे अनेक गमतीशीर पुरस्कार या सोहळ्यात दिले जाणार आहेत. या सोहळ्याचं चित्रीकरण लवकरच होणार असून वर्षाखेरीस त्याचं प्रक्षेपणही होणार असल्याचं समजतं.
SL/ML/SL