संतोष देशमुख हत्या प्रकरण: उज्वल निकम यांना हटवण्याची आरोपींची मागणी
बीड दि १९ …बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या खटल्यातील विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी आरोपींच्या वतीने करण्यात आली आहे. या अर्जावर आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.
या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. उज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी निगडित आहेत, त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीवर आणि पारदर्शकतेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा आरोपींनी केला आहे. “विशेष सरकारी वकील राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने प्रक्रियेत हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ बदलावे,” असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करताना उज्वल निकम यांनी आरोपींचे आरोप खोडून काढले. ते म्हणाले की, “मी एक वकील म्हणून ही केस लढण्यास पूर्णपणे पात्र आहे. कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही जी वकिलाला त्याच्या राजकीय संबंधांमुळे खटला चालवण्यापासून रोखू शकेल.” आरोपींचा हा अर्ज निराधार असून तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, विशेष मकोका न्यायालयाने या अर्जावरील आपला आदेश राखीव ठेवला आहे. न्यायालय आता उज्वल निकम यांची नियुक्ती कायम ठेवणार की आरोपींची मागणी मान्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाची पूर्ण सुनावणी दुपारी झाली
बहुचर्चित खटल्यामध्ये आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरोपी पक्षाकडून वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, येत्या २३ तारखेला या प्रकरणातील दोषारोप निश्चित (Charge Frame) होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
बचाव पक्षाचा वेळ काढूपणा?
न्यायालयात झालेल्या कामकाजाची माहिती देताना ॲड. कोल्हे म्हणाले की, “आम्ही आज या प्रकरणातील सर्व पुरावे एका पेन ड्राईव्हच्या माध्यमातून आरोपीच्या वकिलांना सुपूर्द केले आहेत. मात्र, या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत बचाव पक्षाने न्यायालयासमोर केवळ वेळ काढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर हे पुरावे पाहण्यासाठी त्यांनी लॅपटॉपची देखील मागणी केली.”
गेल्या सुनावणीत नागपूरच्या संदर्भात जो पुरावा सादर करण्यात आला होता, त्यावर खंडपीठाने दिलेला महत्त्वपूर्ण निकाल आज सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आला. आरोपींच्या वकिलांकडून अशा गोष्टींची मागणी केली जात आहे ज्या मुळात सरकार पक्षाच्या ताब्यात नाहीत, असेही ॲड. कोल्हे यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ तारखेला निश्चित केली आहे. या सुनावणीत आरोपींवरील दोषारोप निश्चितीची (Charge Frame) प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे या खटल्याला आता वेग मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.ML/ML/MS