मानवी तस्करी प्रकरणी NIA कडून ४४ जणांना अटक

 मानवी तस्करी प्रकरणी NIA कडून  ४४ जणांना अटक

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मानवी तस्करी प्रकरणी देशभरात ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ५५ ठिकाणी छापे टाकून ४४ जणांना अटक केली आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ आणि राज्य पोलिसांसह एनआयएने भारतात रोहिंग्यांची घुसखोरी आणि पुनर्वसन यामध्ये गुंतलेल्या मानवी तस्करी सिंडिकेटविरुद्ध देशभर शोध घेतला. त्रिपुरामधून २१, कर्नाटकातून १०, आसाममधून ५, पश्चिम बंगालमधून ३, तामिळनाडूमधून २ आणि हरियाणा, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमधून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. एजन्सीने राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्येही कारवाई केली.या वर्षी फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या काही लोकांची चौकशी केली. हे लोक बांगलादेशातून भारतात घुसखोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

NIA टाकलेल्या छाप्यात आधार कार्ड आणि पॅन कार्डसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, ही कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आहे. तसेच या कारवाईत २० लाख रुपये आणि ४५५० अमेरिकन डॉलर (सुमारे ३ लाख ७८ हजार रुपये) रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच एनआयएने कारवाईत मोबाईल फोन, सिमकार्ड आणि पेन ड्राईव्हसह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.

९ सप्टेंबर रोजी आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) मानवी तस्करीशी संबंधित गुन्हा दाखल केला होता. यामध्ये STF ला माहिती मिळाली होती की, मानवी तस्करी सिंडिकेट बांगलादेशातून बेकायदेशीरपणे रोहिंग्या आणि इतर स्थलांतरितांना भारतीय सीमेत घुसवण्याचे काम करत आहे. या लोकांना भारतात आणल्यानंतर त्यांना येथे स्थायिक होण्यासही हे सिंडिकेट मदत करते.

मानवी तस्करी आणि घुसखोरीचे हे नेटवर्क देशभर सक्रिय असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गृहमंत्री अमित शहा फेब्रुवारीपासून या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. शहा यांच्या सूचनेवरून एनआयएने अधिकृतपणे जबाबदारी स्वीकारली आणि आसाममध्ये गुन्हा नोंदवला.

SL/KA/SL

9 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *