‘न्यूटन’ फेम अभिनेता होणार निवडणूक आयोगाचा ‘नॅशनल आयकॉन’
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच राज्यांच्या निवडणूका आणि आगामी लोकसभा निवडणूक यांसाठी अगदी कमी अवधी शिल्लक आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरिने प्रयत्न केले जात आहेत. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यावर निवडणूक आयोगाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. निवडणूक आयोगाने राजकुमार राव याला ‘नॅशनल आयकॉन’ बनवण्याची घोषणा केली आहे. न्यूटन या चित्रपटामध्ये राजकुमारने नक्षलग्रस्त भागामध्ये सशस्वीपणे निवडणूक पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका केली होती.ही भूमिका प्रचंड गाजली होती.
भारतीय निवडणूक आयोगाकडून उद्या म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. सध्या देशभरात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशा परीस्थितीत लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून, जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन भारतीय निवडणूक आयोगाचा ‘नॅशनल आयकॉन’ अभिनेता राजकुमार राव करणार आहे.
अभिनेता राजकुमार राव याने आजवर बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचे सगळेच चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. ‘न्यूटन’ या चित्रपटातून त्याला विशेष ओळख मिळाली होती. २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी राजकुमार राव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘न्यूटन’ या चित्रपटात राजकुमार राव, नूतन कुमार नावाच्या सरकारी लिपिकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात देखील त्याने निवडणुकीशी संबंधित एक भूमिका साकारली होती. राजकुमारने साकारलेलं नूतन कुमार हे एक असं पात्रं होतं, जे निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात लढताना दिसलं. त्याच्या याच भूमिकेप्रमाणे आता त्याला प्रत्यक्ष आयुष्यात देखील लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह निर्माण करायचा आहे.
SL/KA/SL
25 Oct. 2023