राणा दाम्पत्याच्या नावे नव्यानं वॉरंट जारी
मुंबई, दि.1( एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या’मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नावे पुन्हा नव्यानं वॉरंट जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि अमरावती जिल्ह्याच्या अपक्ष खासदार त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनी हनुमान चालिसा पठणाचं आंदोलन पुकारलं होते.
त्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दांपत्याला कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी हे आंदोलन न करण्याबाबत सीआरपीसी कलम 192 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र तरीही याबद्दल मीडियात प्रक्षोभक वक्तव्य करणा-या राणा दांपत्याविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 153A, 34,37 सह मुंबई पोलीस कायदा 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यातच नंतर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही वाढवण्यात आला.
23 एप्रिल, शनिवारी आंदोलनाच्या दिवशी संध्याकाळी या प्रकरणात राणा दांपत्याला खार पोलीसांनी अटक करून रविवारी वांद्रे दंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं. तेव्हा कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार राणांची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढे मुंबई सत्र न्यायालयानं या दोघांना जामीन मंजूर केला होता.
मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुरू असलेल्या या खटल्यास राणा दाम्पत्य सतत तीन सुनावणीत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं पुन्हा नव्यानं वॉरंट जारी केला आहे.
SW/KA/SL
1 Dec. 2022