पान मसाला-सिगारेटवर नवीन कर- संसदेत विधेयक मंजूर
नवी दिल्ली, दि. 5 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत आरोग्य सुरक्षेतून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यावर सिगारेट , पान मसाला सारख्या उत्पादनांवर सरकार अतिरिक्त कर लावेल. सरकारच्या तिजोरीत जमा होणारा अतिरिक्त पैसा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती आज लोकसभेत दिली. ‘महसूल गोळा करणं गरजेचं आहे. देशाची सुरक्षा आणि लोकांचं आरोग्य दोन्ही मजबूत राहायला हवं. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूवर उपकर लावण्यात आलेला नाही. तर आरोग्यासाठी घातक उत्पादनांवर लादलेला आहे,’ असं अर्थमंत्री म्हणाल्या.
विधेयक मंजूर झाल्यानं पान मसाला सारख्या वस्तू महाग होतील. या विधेयकावर संसदेत बराच वेळ चर्चा झाली. दोन दिवस चर्चा झाल्यानंतर विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे नागरी आरोग्याच्या सुविधा मजबूत करण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटलं. ‘लोकांच्या आरोग्याशी संबंधित धोके कमी करण्याचा आमचा हेतू आहे. हा उपकर राष्ट्रीय सुरक्षेच्या आघाडीवर सहाय्यक ठरेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवरील सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘आज जगात हायटेक युद्धाचा काळ आहे. अत्याधुनिक हत्यारं अतिशय महाग आहेत. सायबर ऑपरेशनसाठी बराच पैसा लागतो. कारगिलमध्ये भारताचं नुकसान झालं. कारण लष्कराकडे अपुरा निधी होता. तेव्हा ७० ते ८० टक्के हत्यारं आपल्याकडे होती. दारुगोळा मर्यादित होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये,’ असं अर्थमंत्री म्हणाल्या.
SL/ML/SL