RSS च्या कामावर नजर ठेवण्यासाठी या राज्याकडून नवीन नियम लागू

बंंगळुरु, दि. १६ : कर्नाटक सरकारने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याच्या संलग्न संस्थांच्या सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी जागांमध्ये होणाऱ्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माहिती तंत्रज्ञान आणि जैव-तंत्रज्ञान मंत्री प्रियंक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. या पत्रात त्यांनी RSS आणि त्याच्या संलग्न संस्थांच्या उपक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. खर्गे यांनी स्पष्ट केले की कोणत्याही संस्थेवर थेट नियंत्रण ठेवता येणार नाही, परंतु सार्वजनिक ठिकाणी कोणतीही उपक्रम करण्यासाठी आता सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
सरकारने यासंदर्भात २०१३ मध्ये तत्कालीन भाजप सरकारने जारी केलेल्या एका परिपत्रकाचा दाखला दिला आहे, ज्यात शाळा परिसर आणि संलग्न खेळाच्या मैदानांचा वापर केवळ शैक्षणिक उद्देशासाठीच करण्याचे निर्देश दिले होते. या परिपत्रकाचा आधार घेत सध्याच्या काँग्रेस सरकारने BJP विरोधात भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिवांना तमिळनाडू सरकारने RSS च्या उपक्रमांवर घेतलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि सरकारी मालकीच्या संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय आता सरकारच्या विवेकाधिकारावर अवलंबून असेल.
या निर्णयामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्ष भाजपने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मात्र काँग्रेस सरकारने स्पष्ट केले आहे की हा निर्णय संविधानिक चौकटीत राहून सार्वजनिक ठिकाणांचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी घेतला गेला आहे.
SL/ML/SL 16 Oct. 2025