शेतकऱ्यांसाठी सोयाबीन विक्रीसंदर्भात नवीन नियम
मुंबई, दि. ३० : राज्य शासनाकडून आजपासून सोयाबीन हमीभावाने ऑनलाइन बुकिंग सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.मात्र यासाठी एक विचित्र अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. “सरकार मदत करत नाही, उलट त्रास देतेय” अशी भावना व्यक्त केली जात आहे. या वेळी शेतकऱ्यांना नोंदणी आणि विक्रीच्या दोन्ही टप्प्यांवर शेतकऱ्याच्या अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या वर्षीची खरेदी प्रक्रिया पूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीवर आधारित ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून अंगठा लावून नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर जेव्हा त्यांच्या विक्रीचा नंबर लागेल, तेव्हा पुन्हा एकदा अंगठा स्कॅन करावा लागेल. सरकारने प्रत्येक केंद्रावर यासाठी आवश्यक उपकरणे आणि प्रिंटर उपलब्ध करून देण्यात येतील, असा दावा केला आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक खरेदी केंद्रांवर अद्याप तांत्रिक अडचणी कायम आहेत. नेटवर्क समस्या, उपकरणांच्या देखभालीचा अभाव आणि वीजपुरवठ्याचे अडथळे यामुळे प्रक्रिया लांबत आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे. काही केंद्रांवर सर्व्हर डाऊन असल्याने प्रक्रिया पूर्ण होण्यास दिवस लागतात. त्यामुळे वृद्ध शेतकरी आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “दोन-दोन दिवस केंद्रावर थांबणे आमच्यासाठी शक्य नाही. शासनाने ही अंगठा लावण्याची अट काढून टाकावी,” अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
SL/ML/SL