ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १ जूनपासून लागू होणार नवीन नियम
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशातील सध्याच्या वाहतूक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल १ जूनपासून होणार आहेत. सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळविण्यासाठी वैयक्तिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र, बदल करण्यात येणाऱ्या नियमांनुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ असणाऱ्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकतात.
खासगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्रे देण्यात येतील; ज्याच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे व्यवस्थापन करू शकतील. वैध परवान्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांसाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा चालकांना आता तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच, अल्पवयीन चालक पकडला गेल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते.
परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्येदेखील सुलभता आणण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जदाराला कोणत्या पद्धतीचा परवाना हवा आहे आणि त्यासाठी त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याबद्दलची यादी आधीच अर्जदाराला देण्यात येईल.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने साधारण नऊ हजार कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इतर वाहनांच्या उत्सर्जनासंबंधीचा तपास करून, आपले महामार्ग पर्यावरणास अधिक अनुकूल करण्याकडे भर देण्यात येणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. https://parivahan.gov.in/ या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने अर्जदार परवान्यासाठी अर्ज करू शकतात.
खासगी ड्रायव्हिंग स्कूलसाठी सुधारित नियम
१. जमिनीची आवश्यकता :
दुचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जमीन, तर चारचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान दोन एकर जमीन आवश्यक आहे.
२.चाचणीद्वारे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश
ड्रायव्हिंग स्कूलने अर्जदारास योग्य त्या चाचणी सुविधेमध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे.
३. प्रशिक्षकाची पात्रता :
प्रशिक्षकाकडे उच्च माध्यमिक वर्गाचा डिप्लोमा (किंवा त्यासमान शिक्षण) असणे आवश्यक आहे. तसेच, किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक असून, त्याला बायोमेट्रिक्स आणि IT प्रणाली यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
४. प्रशिक्षण कालावधी :
हलकी मोटार वाहने (LMV) : चार आठवड्यांत २९ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यात आठ तासांचे माहिती आणि २१ तासांचे प्रात्यक्षिक, असे प्रशिक्षण समाविष्ट आहे.
जड मोटार वाहने (HMV) :सहा आठवड्यांत ३८ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यामध्ये आठ तासांचे माहिती आणि ३१ तासांचे प्रात्यक्षिक, असे प्रशिक्षण समाविष्ट आहे.
SL/ML/SL
22 May 2024