उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम
मुंबई, दि. २५ : कॅब बुकिंगच्या नावाखाली सुरू असलेली ‘आधी टिप द्या, मग राईड मिळवा’ ही पद्धत केंद्र सरकारकडून बंद करण्यात आली आहे. उबर, ओला, रॅपिडो आणि नम्मा यात्रीसारख्या कॅब अॅग्रिगेटर अॅप्सवर राईड सुरू होण्याआधी टिप मागण्याससुद्धा सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा बदल करत कॅब अॅप्सवर महिला चालक निवडण्याचा पर्याय चालकांच्या उपलब्धतेनुसार बंधनकारक करण्यात आला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) १५ डिसेंबरला जाहीर केलेल्या मोटार वाहन अॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५ मधील दुरुस्तीत हा निर्णय स्पष्ट करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार प्रवास पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना चालकाला ऐच्छिक टिप देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. बुकिंग किंवा राईड शोधताना टिप देण्याचा पर्याय दिसणार नाही.
मार्गदर्शक तत्त्वांतील कलम १४.१५ नुसार, प्रवाशांनी दिलेली संपूर्ण टिप कोणतीही कपात न करता थेट चालकाच्या खात्यात जमा करणे अॅग्रिगेटरवर बंधनकारक असेल. हा निर्णय केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) मे २०२५ मध्ये अॅडव्हान्स टिप फीचरला ‘अन्यायकारक व्यापार पद्धत’ ठरवल्यानंतर घेण्यात आला आहे. जास्त टिप देणाऱ्यांनाच कॅब मिळते, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या होत्या.