नव्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार , भुजबळ , वळसे पाटील यांना डच्चू
नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील तर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर या वरिष्ठ मंत्र्यांना वगळण्यात आले आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने अनेक जुन्या चेहऱ्याना घरी बसवले आहे. यात भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार , रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित , सुरेश खाडे या मंत्र्याचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल भाईदास पाटील, धर्मराव आत्राम आणि संजय बनसोडे यांना तर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर ,तानाजी सावंत या मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
नवीन मंत्रिमंडळात तब्बल 33 कॅबिनेट मंत्री असून त्यात गणेश नाईक, जयकुमार रावल, पंकजा मुंडे ,अशोक उईके ,आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले , जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे आणि आकाश फुंडकर यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील , संजय राठोड , शंभूराज देसाई या जुन्या मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळाले असून संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि प्रकाश आबिटकर यांना नव्याने कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांना कायम ठेवण्यात आले असून माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवाळ , मकरंद जाधव पाटील आणि बाबासाहेब पाटील यांना नव्याने कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.
नवीन राज्यमंत्र्यांमध्ये भाजपाच्या माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर साकोरे आणि पंकज भोयर यांचा समावेश आहे तर शिवसेनेच्या वतीने आशिष जयस्वाल आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रानिल नाईक यांना देखील राज्यमंत्री करण्यात आले आहे.
ML/ML/PGB
15 Dec 2024