महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहा वाण, चार कृषि यंत्रे, आणि 70 कृषि तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

 महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहा वाण, चार कृषि यंत्रे, आणि 70 कृषि तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

अहमदनगर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 50 वी बैठक संपन्न झाली.

यात राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांनी या वर्षी शेतकर्यांसाठी विविध पिकांचे सहा वाण, चार कृषि यंत्रे-अवजारे आणि 70 कृषि तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करण्यात आल्या आहे. या वाणांमुळे व तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल व नवीन यंत्र व अवजारांमुळे शेतकर्यांचे श्रम कमी होतील
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वाखाली शेतपिके वाण प्रसारण व शेतपिके वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकारी कायद्यांतर्गत या कृषि विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या व त्यास समितीने मान्यता दिली.

या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहा वाण, चार कृषि यंत्रे अवजारे आणि 70 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. यामध्ये रब्बी ज्वारी-फुले पुर्वा, राजमा-फुले विराज, उडीद-फुले राजन, मुग-फुले सुवर्ण, ऊस-फुले 15012, आणि हळद-फुले हरिद्रा हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले सेंद्रिय भरखते देण्याचे यंत्र, ट्रॅक्टरचलीत फुले दोन ओळींमध्ये चालणारा फॉरवर्ड-रिव्हर्स रोटाव्हेटर, ट्रॅक्टरचलीत फुले केळी खुंट कुट्टी यंत्र व फुले रस काढणी यंत्र प्रसारीत करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी दिली.

ट्रॅक्टरचलित फुले दोन ओळीमध्ये चालणारा फॉरवर्ड- रिव्हर्स रोटावेटर

प्रसारीत वाण
1. रब्बी ज्वारी- फुले पूर्वा : रब्बी ज्वारीचा फुले पूर्वा हा न लोळणारा व काढणीस सुलभ वाण, कोरडवाहू क्षेत्रातील भारी जमिनीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यात आला आहे.
2. राजमा- फुले विराज : राजमा पिकाचा फुले विराज या अधिक उत्पादनक्षमता व फिक्कट पांढर्या रंगावर तपकिरी रंगाच्या छटा असलेला वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे.
3. उडिद- फुले राजन : उडिदाचा फुले राजन या अधिक उत्पादन देणार्या वाणाची महाराष्ट्रातील खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आली आहे.
4. मुग- फुले सुवर्ण : मुग पिकाचा फुले सुवर्ण हा वाण या अधिक उत्पादन देणारा, लवकर तयार होणारा असून या वाणाची महाराष्ट्रातील खरिप हंगामासाठी प्रसारित करण्यात आली आहे.
5. ऊस- फुले 15012 : ऊसाचा फुले 15012 हा वाण मध्यम कालावधीत पक्व होणारा, अडसाली, पूर्व आणि सुरू हंगामात महाराष्ट्रासाठी लागवडीकरिता प्रसारित करण्यात आला आहे.
6. हळद- फुले हरिद्रा : हळदीचा फुले हरिद्रा हा वाण ओल्या आणि वाळलेल्या हळदीच्या अधिक उत्पादन तसेच गर्द पिवळसर गाभ्याचा रंग, सरळ हळकुंडे आणि चांगले कुरकुमीन असल्याने पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आला आहे.

प्रसारीत यंत्रे
1. फळबागेला खते देण्यासाठी ट्रॅक्टर चलित फुले सेंद्रिय भरखते देण्याचे यंत्र प्रसारित करण्यात आले आहे.
2. ऊसाच्या दोन ओळीतील आंतरमशागत व भर घालणे करिता ट्रॅक्टरचलित फुले दोन ओळींमध्ये चालणारा फॉरवर्ड-रिव्हर्स रोटाव्हेटर प्रसारित करण्यात आले आहे.
3. केळीच्या बागेत खुंटाची कुट्टी करणारे ट्रॅक्टर चलित फुले केळी खुंट कुट्टी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे.
4. फळे व भाज्यांचा रस काढण्यासाठी फुले रस काढणी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे.

ML/KA/SL

16 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *