अखेर नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

 अखेर नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आणि त्यात महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतरही गेले सात दिवस नवे सरकार कधी अस्तित्वात येईल याबाबत असलेली अनिश्चितता आता अखेर संपली असून नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच तारखेला मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेला मुहूर्त मिळाला आहे.

महायुतीत असणारा सुप्त संघर्ष या सरकारच्या स्थापनेसाठी आजवर अडथळा ठरला होता. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन देखील त्यात मंत्रिमंडळाचा चेहरा ठरला नाही त्यासोबतच खाते वाटपावरही सहमती होऊ शकलेली नव्हती. यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक त्यांच्या मूळ गावी दोन दिवसासाठी निघून गेले होते.

एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी आज दिवसभरात कोणाचीही भेट घेतली नाही त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टर देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र अमावस्येच्या दिवशी शिंदे दोन दिवस आपल्या मूळ गावी का गेले, एवढे बहुमत मिळूनही आनंदोत्सव का नाही असे सवाल आज शिवसेना उभाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत तर शिंदे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे विधान संजय राऊत यांनी केले. यावर मानसिक स्थिती कोणाची बिघडली आहे हे निवडणूक निकालाच्या दिवशी दिसून आले असे प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी दिले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमी वरती आज अजित पवार यांनी पुण्यात नव्या सरकारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री असेल असे स्पष्ट केले. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापने संदर्भातील काही गोष्टी लोकांसमोर उघड झाल्या आहेत .

आज सायंकाळी उशिरा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर नव्या सरकारचा मुहूर्त जाहीर केला. येत्या पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा केला जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे. त्याआधी तीन डिसेंबरला भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यात नव्या नेत्याची निवड केली जाईल असेही त्यांनी सांगितले. याआधी त्यांनी आज दिवसभर भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची आभासी बैठक घेऊन त्यात नवीन सरकारच्या स्थापनेबाबत काही सूचना केल्याचे समजते.

नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यासाठी एकनाथ शिंदे तयार नसल्याचे बोलले जात होते मात्र त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सरकारमध्ये सामील होण्यास गळ घातली आहे. त्यासोबतच मावळत्या सरकारमधील उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद हा फॉर्म्युला तसाच्या तसा पुन्हा लागू करावा असे विधान करून शंभूराज देसाई यांनी शिवसेनेला गृहमंत्री पद हवे आहे असे पुन्हा एकदा सूचित केले आहे. मात्र नवीन सरकारच्या खाते वाटपात कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळतील हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. तरीही येत्या पाच तारखेला नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होऊन नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील अशीच अपेक्षा सगळ्यांना आहे.

ML/ML/PGB 30 Nov 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *