राज्यात तिसरी ते दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम जाहीर

 राज्यात तिसरी ते दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम जाहीर

मुंबई, दि. २८ : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या मसुद्यातून हिंदी भाषा सध्या वगळण्यात आली आहे. अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात हिंदी भाषेच्या सक्तीवरून पेटलेला वाद असताना हा सुधारित अभ्यासक्रम जाहीर करण्यात आळा आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश काढल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय तात्पुरता मागे घेतला. आता राज्य शासनाने नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा जाहीर केला असून, यात सध्या तरी मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांना स्थान देण्यात आले आहे.

एससीईआरटीचे संचालक डॉ. राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले की, सध्या पहिली व दुसरी भाषा म्हणून मराठी आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तिसऱ्या भाषेचा समावेश हा त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशींवर आणि शासनाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या दिशानिर्देशांनुसार तयार करण्यात आला आहे. यात अनेक महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. यात व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन, भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश, वाहतूक सुरक्षा, नागरी संरक्षण आणि समाजसेवा यांसारख्या समकालीन विषयांनाही नव्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले आहे.चौथीसाठीचे ‘शिवछत्रपती’ हे पाठ्यपुस्तक कायम राहणार आहे.

या प्रस्तावित मसुद्यावर राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, पालक, अधिकारी आणि नागरिकांनी अभिप्राय द्यावा, असे आवाहन एससीईआरटीने केले आहे. हा मसुदा www.maa.ac.in या संकेतस्थळावर 28 जुलैपासून उपलब्ध असून, 27 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अभिप्राय नोंदवता येणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *