कर्करोगावरील नवी लस लवकरच होणार उपलब्ध

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्करोगावर परिणामकारक लस निर्मितीसाठी विविध वैद्यकीय संशोधक आणि डॉक्टर प्रयत्नशील आहेत. कर्करोगावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘आयुष’ मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला आहे. अर्थसंकल्पाबाबत जागृती करण्यासाठी मंत्र्यांच्या कार्यक्रमाअंतर्गत मंत्री प्रतापराव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी अर्थसंकल्प आणि त्यातील आरोग्य क्षेत्राच्या तरतुदीची माहिती दिली. कर्करोगाच्या निदानासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल सांगितले. कर्करोग या गंभीर आजाराला आळा घालण्यासाठी लस विकसित केली जात आहे. ही लस रुग्णांसाठी लवकर उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर, कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालयात एक विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त, पुढील पाच वर्षांत 75 हजार डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत तसेच पुढील वर्षातच 10 हजार डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. एकूण अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी 99 हजार 858. 56 लाख कोटी रुपयांचा निधी असून यामध्ये आयुष मंत्रालयाचा चार हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले
कर्करोगावरील नव्या संशोधनामुळे या गंभीर आजारावर नेमके निदान होऊ शकणार आहे. संशोधनातून समोर आलेली ही नवी लस कॅन्सरवर परिणामकारक असून ती लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. हे नवे लस संशोधन अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झाली आहे. येत्या सात-आठ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचा दावा ‘आयुष’ मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला.
SL/ML/SL
19 Feb. 2025