संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळला नवा पक्षी

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळला नवा पक्षी

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या जैवविविधतेसाठी वरदान आहे. विविध पशुपक्ष्यांच्या अधिवास असलेल्या या जंगलात सध्या पक्षीगणना सुरु आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ४२ हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने पक्षांची नोंद करीत आहे. आतापर्यंत एकूण ८४ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे.या पक्षी गणणेदरम्यान पांढऱ्या रंगाचे पोट असलेल्या सागरी गरुडाचे (व्हाईट – बिलिड सी – ईगल) दर्शन घडले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पक्षीगणना सुरू असून ते काम दीर्घकालीन स्वरूपाचे आहे. या पक्षी गणणेत प्रत्येक ऋतूमध्ये दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात येत आहे. याच सर्वेक्षणादरम्यान राष्ट्रीय उद्यानात पांढऱ्या रंगाचे पोट असलेल्या सागरी गरुडाची नोंद करण्यात आली.

समुद्री गरूड हा पक्षी सामान्यतः बेट, किनारी प्रदेश आणि पाणथळ प्रदेशात आढळतो. हा पक्षी जंगल किंवा खडकाळ प्रदेशात घरटे बांधून राहतो. समुद्री गरूड हा घारीपेक्षा आकाराने मोठा असून त्याचा रंग वरून करडा असतो, तर डोके, मान व खालचा भाग पंढरा शुभ्र असतो. उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीचा आकार यामुळे या पक्ष्याची ओळख पटते. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. समुद्रकिनाऱ्यावर ते एकटे किवा जोडीने आढळतात. श्रीलंका, लक्षद्विप, अंदमान आणि निकोबार बेट तसेच गुजरातमध्ये हे पक्षी आढळतात.

दक्षिण भारतात नोव्हेंबर – मार्च, तर उत्तरेकडे जानेवारी – एप्रिल या काळात सागरी गरुड आढळतात. पांढऱ्या पोटाचे सागरी गरूड साधारणपणे झाडावर उंचावर बसलेले किंवा जलमार्ग आणि लगतच्या जमिनीपासून उंचावर विहार करताना आढळतात. प्रामुख्याने मासे, कासव आणि समुद्री साप यांसारखे जलचर ते खातात. हा एक कुशल शिकारी पक्षी आहे. या पक्ष्यांचा प्रजनन हंगाम मे – ऑक्टोबर दरम्यान असतो. प्रजनन हंगामाच्या सुरुवातीला ताजी हिरवी पाने आणि डहाळ्यांनी ते घरटे विणतात. यांचे घरटे जमिनीपासून झाडावर ३० मीटर उंचीवर असते.

SL/ML/SL

30 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *