नीट परीक्षा घोटाळा ; कोर्टाने सुनावली 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
लातूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीट परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याचे रॅकेट चालवणाऱ्या चार जणांविरोधात लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील जलिलखाॅं पठाण या संशयित आरोपीस रविवारी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी संजय जाधव यास पोलिसांनी अटक केलीय. त्यास आज मंगळवारी लातूरच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले असता 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड. श्रीकांत बोराडे यानी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय जाधव हे मोबाईलवरून इच्छुक विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि अडव्हान्स पैसे जमा करून या प्रकरणातील उमरगा येथील तिसरा संशयित इरान्ना कोनगलवार कडे पाठवून द्यायचा, असा त्याच्यावर आरोप आहे.
ML/ML/SL
25 June 2024