राज्यपाल शपथविधीप्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून नवीन राज्यपालांचा केला सत्कार

मुंबई, दि १५:
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ११ वाजता झालेल्या या सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या शपथविधी प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री माणिकराव कोकाटे आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा पुष्पगुच्छ आणि डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘राजर्षी शाहू छत्रपती’ हे पुस्तक देऊन सन्मान केला. त्यांनी राज्यपालांना नवीन जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे कार्य फलदायी ठरावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
शपथविधी हा लोकशाही परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “मा. राज्यपालांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनात नवी ऊर्जा आणि दिशा निर्माण होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
हा सोहळा राज्यघटनेच्या मूल्यांचा सन्मान करणारा आणि लोकशाहीतील विश्वास अधिक बळकट करणारा ठरला.KK/ML/MS