लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

 लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

मुंबई दि.२४:– मुंबईतील रंगशारदा येथे लाडक्या बहिणींच्या मंगळागौर महास्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महिलांनी सादर केलेल्या विविध खेळांमुळे सभागृहात आनंद, उत्साह आणि भगिनीभावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या मेहनतीचे, कलागुणांचे आणि एकमेकींवरील विश्वासाचे मनापासून कौतुक केले. “सरावाच्या काळातील परिश्रम आणि खेळताना दाखवलेला विश्वास हेच खऱ्या भगिनीभावाचे दर्शन घडवणारे आहे, यामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत असल्याचे आज दिसून आले,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी खंत व्यक्त केली. तथापि, शिंदे यांनी स्वतः फोन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, पुढील काही दिवसांत त्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती दिली. “साहेब आले असते तर महिलांना त्यांच्या चार शब्दांचा आधार लाभला असता. तरीदेखील पुढील मोठ्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करून अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढवूया,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचा दाखला देत सांगितले की, “महिलांचा सन्मान कधीच मागून मिळत नाही, तो स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवावा लागतो.” पुढे बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा उल्लेख करत सांगितले की, महिलांना मिळणाऱ्या ५० टक्के आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर महिला निवडून येतील. “तुळजाभवानीच्या कृपेने महिलांना भरघोस यश मिळेल आणि त्यात आपल्यापैकी अनेकांचा सहभाग असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे संयोजन मीनाताई, सुशांत शेलार, दिनेश शिंदे, शितल म्हात्रे आदींनी केले होते. त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांचा कार्यक्रम घेणे सोपे नाही; त्यासाठी परिश्रम, संयोजनशक्ती आणि सातत्याची गरज असते.” उपस्थित महिलांच्या दमदार परफॉर्मन्समुळे कार्यक्रमाला विशेष रंगत चढल्याचे त्यांनी नमूद केले.

मंगळागौरीच्या खेळांना श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडत त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या आराधनेचा उल्लेख केला. महिलांच्या आंदोलनांतील सहभाग आणि मोर्च्यांमधील धैर्याचे दर्शन चित्रपटांतून घडवले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “प्रत्येक महिला ही हिऱ्यासारखी आहे; हिऱ्याची चमक कायम टिकते. त्यामुळे तुम्हा सर्वांना भविष्यात अजून मोठे यश आणि स्थान मिळो,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

भाषणाचा शेवट करताना डॉ. गोऱ्हे यांनी महिलांना राजकारण व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होण्याचे आवाहन केले आणि “जय महाराष्ट्र”च्या घोषणेसह आपल्या मनोगताची सांगता केली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *