राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान यात्रा’ ८ ऑगस्टपासून

 राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान यात्रा’ ८ ऑगस्टपासून

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा येत्या ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होणार असून त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच आम्ही ‘जनसन्मान यात्रा’ हे नाव ठेवले आहे असे सुरुवातीला सांगतानाच आणि काही योजना अर्थमंत्री म्हणून अजितदादा यांनी दिल्या त्या योजना जनतेपर्यंत पोचवाव्यात हासुद्धा जनतेचा एकप्रकारे सन्मान आहे असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राज्याची आर्थिक घडी आणि स्थिती जराही विस्कटणार नाही याची खबरदारी घेत आर्थिक शिस्तीचे एक नवीन पर्व महाराष्ट्रात, सरकारच्या अर्थकारणात अजितदादा पवार यांनी निर्माण केले.
लोकशाहीवर दृढविश्वास असल्यामुळे लोकाभिमुख योजना जाहीर केल्या. ज्या योजना जाहीर झाल्या आहेत त्या जनतेवर उपकार नाही तर या राज्यातील जनतेने आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला त्यामुळे जनतेच्या विश्वासाच्या माध्यमातून आम्ही सगळे काम करत आहोत हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

अजितदादांच्या ३५ वर्षाच्या राजकीय जीवनाचा मागोवा घेतला तर जनतेचे हित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम त्यांनी केले आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही ‘जनसन्मान यात्रा’ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असून याची सुरुवात नाशिक जिल्हयातून करणार आहोत. ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद अजितदादा करणार आहेत. ही यात्रा योजनांपुरती सिमीत न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्याही अजितदादा जाणून घेणार आहेत असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन सभा किंवा कार्यक्रम घेणार आहोत. महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी अजितदादा संवाद करतील. या संवादात त्यांच्या मनातील भावना समजून घेत सरकारच्या यंत्रणांमार्फत अधिक प्रभावीपणे योजना पोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. संघटना म्हणून पूर्ण ताकदीने, क्षमतेने जनसन्मान यात्रेत सहभागी होणार आहे असेही तटकरे यांनी सांगितले.

१५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सुरू होईल. ती २२ ऑगस्टपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी विदर्भातून सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा सलग पाच दिवसाचा दौरा आहे. यामध्ये दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगर
मधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. या यात्रेमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान, सर्वसामान्य जनतेशी संवाद हा महत्त्वाचा भाग असणार आहे. या यात्रेत प्रत्येक दिवशी संध्याकाळी आमच्या महायुतीतील मित्रपक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहोत. महायुतीमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे ही यामागची भूमिका आहे असेही सुनिल तटकरे यांनी हेही आवर्जून स्पष्ट केले.

पहिल्या पाच दिवसानंतर सलग पाच दिवस पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदारसंघात तर त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रा ईस्ट, कुर्ला, मानखुर्द – शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा- कळवा, भिवंडी ईस्ट, शहापूर या मतदारसंघात नंतर विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रम्हपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदारसंघात ही यात्रा जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

ML/ ML/ SL

5 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *