घड्याळ चिन्ह वापरण्यासाठी राष्ट्रवादीला घ्यावी लागणार परवानगी
मुंबई, दि. १ (एमएमएसी न्यूज नेटवर्क) : २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग धडाडीने कामाला लागला आहेत. राज्यभरातील पक्ष आणि त्यांची निवडणूक चिन्ह यांचीही दरम्यान पडताळणी करण्यात येत आहे. ‘एप्रिल महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय पक्ष’हा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला घड्याळ हे चिन्ह अन्य राज्यांतील निवडणूकांमध्ये वापरायचे असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. हे चिन्ह देश पातळीवर वापरू द्यायचे की नाही हा निर्णय निवडणूक आयोग घेईल,’ अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. ते सध्या निवडणूकपूर्व कामांची पहाणी करण्यासाठी राज्यभर दौरा करत आहेत.
1968 सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.
हे आहेत राष्ट्रीय पक्षासाठीचे निकष
जो राजकीय लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं प्राप्त करेल अशाच पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.
SL/KA/SL
1 June 2023