राष्ट्रवादी आता केवळ प्रादेशिक पक्ष
नवी दिल्ली, 10 एप्रिल : २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले असताना भारतीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. सीपीआय आता केरळ, मणिपूर आणि तामिळनाडूमध्ये राज्याचा दर्जा असलेला राज्य पक्ष म्हणून गणला जाईल.
हे आहेत राष्ट्रीय पक्षासाठीचे निकष
जो राजकीय लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं प्राप्त करेल अशाच पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.
घड्याळाला अन्य राज्यात बंदी
1968 सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.
आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा
दरम्यान निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाला झाडू नॅशनल पार्टी म्हणून निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
SL/KA/SL
10 April 2023